पुण्यात मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश
पुणे, 20 मे (हिं.स.)आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्ह्यांनी पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश प्रभारी विभा
पुण्यात मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश


पुणे, 20 मे (हिं.स.)आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्ह्यांनी पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्तकविता द्विवेदीयांनी दिले. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.विधानभवनात आयोजित मान्सूनपूर्व तयारीच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

या बैठकीला सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अल निनोच्या प्रभावाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचनाही द्विवेदी यांनी दिल्या. मान्सून काळात मोठ्या प्रमाणावर पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नालेसफाईची उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील दरडप्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी नियोजन तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठ व नाल्यालगत राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.पावसाळ्यात जलजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यांत पुरेशा प्रमाणात औषधे आणि लसींचा साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दूषित पाण्यामुळे आजार पसरू नयेत यासाठी नियमित पाणी तपासणी, क्लोरीनचा वापर आणि अन्य शुद्धीकरण उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.बैठकीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तुकड्या सज्ज असल्याचा आढावा घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘आपत्ती मित्र’ यांची नियुक्ती व प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींना जीवरक्षक जॅकेट, बॅटऱ्या, दोरखंड आणि आवश्यक ठिकाणी बोटी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आलमट्टी धरणाच्या पूरनियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या जलसंपदा विभागांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीचा आणि पुढील नियोजनाचा आढावाही यावेळी सादर करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande