‘अर्थपूर्ण संबंधांमुळे अभय’; मनसेचा पुणे महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
पुणे, 20 मे (हिं.स.)। देशभर गाजलेल्या वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर याच्या डेक्कन जिमखाना परिसरातील बेकायदा क्लासेसवर अखेर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त
‘अर्थपूर्ण संबंधांमुळे अभय’; मनसेचा पुणे महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप


पुणे, 20 मे (हिं.स.)।

देशभर गाजलेल्या वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर याच्या डेक्कन जिमखाना परिसरातील बेकायदा क्लासेसवर अखेर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त कार्यालयात आंदोलन छेडल्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित क्लासेस सील करण्याचे निर्देश दिले.डेक्कन जिमखाना येथील जंगली महाराज रस्त्यावरील बोरावके इमारतीमध्ये आर.सी.सी. मोटेगावकर क्लासेस चालविले जात होते. मात्र या इमारतीला महापालिकेकडून अद्याप भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तसेच अग्निशामक विभागाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसतानाही इमारतीचा वापर करून क्लासेस सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 
मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी याबाबत दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित क्लासेस बंद करण्याची मागणीही त्यांनी केली होती. तक्रारीची छाननी केल्यानंतर बांधकाम विभागाने जागामालकाला नोटीस बजावत क्लासेस बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून क्लासेस सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप करत संभूस यांनी अधिकाऱ्यांवर आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप केला. याविरोधात मनसेने आज आयुक्त कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित क्लासेस सील करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande