छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या राज्यस्तरीय समितीवर डॉ. नीलम गोऱ्हेंची निवड
* सातारा जिल्ह्याची ''प्रभारी'' म्हणून जबाबदारी मुंबई, 20 मे (हिं.स.) - सर्वसामान्यांचे शासकीय प्रश्न एकाच छताखाली गतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र.
नीलम गोऱ्हे


* सातारा जिल्ह्याची 'प्रभारी' म्हणून जबाबदारी

मुंबई, 20 मे (हिं.स.) - सर्वसामान्यांचे शासकीय प्रश्न एकाच छताखाली गतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १)' राबवले जात आहे. हे अभियान अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी शासनाने नुकतीच राज्यस्तरीय समितीची फेररचना १८ मे, २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार (GR) केली आहे. महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या उच्चस्तरीय समितीमध्ये शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्यावर 'सातारा' जिल्ह्याची जिल्हास्तरीय प्रभारी (In-charge) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

​या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आणि सोपवलेल्या जबाबदारीबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि नेत्या सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

​या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील नियोजित शिबिरांच्या यशस्वीतेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे या विशेष प्रयत्न करणार आहेत. त्या जिल्ह्यातील शिबिर स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी दौरे करतील, तसेच या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वय बैठका घेऊन आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना व निर्णय घेतील.

​असे असेल अभियानाचे स्वरूप व कामे

'शासन आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारित या अभियानात नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, म्हणून एकाच छताखाली अनेक सेवा दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न, जात व रहिवासी दाखले देणे; ७/१२, ८-अ उतारा व फेरफार नोंदींमधील त्रुटी दूर करणे; संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अर्ज मंजूर करणे, तसेच नवीन शिधापत्रिका (रेशन कार्ड) व ओळखपत्र दुरुस्ती यांसारखी सर्व महत्त्वाची कामे जागेवरच निकाली काढली जातात.

​डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व्यापक सामाजिक आणि प्रशासकीय अनुभवामुळे सातारा जिल्ह्यातील महसूल शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील हजारो नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande