
रायगड, 20 मे (हिं.स.)। : रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत तसेच सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी केले आहे.
या मोहिमेत विना हेल्मेट वाहन चालविणे, अवैध विमा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, वैध पीयूसी प्रमाणपत्र नसणे, विना नंबर प्लेट वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, ऑटो रिक्षा नियमभंग, ओव्हरलोड मालवाहतूक आणि वैध परवाना नसलेल्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
गौण खनिज आणि ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत २३५ वाहनांवर कारवाई करून सुमारे १ कोटी २८ लाख ९६ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक, ताडपत्री नसणे, नंबर प्लेट नसणे आणि रिफ्लेक्टर नसणे अशा प्रकारच्या नियमभंगांवर विशेष कारवाई करण्यात आली.
सन २०२५-२६ आणि एप्रिल २०२६ या कालावधीत एकूण २६ हजार ५३९ दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून १ कोटी ५ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या ११ हजार २४३ वाहनचालकांवर, अवैध विमा असलेल्या ५ हजार ९७३, ओव्हरलोड वाहनांवर २ हजार ३४९, मोबाईल वापरणाऱ्या ८०४, पीयूसी नसलेल्या ६ हजार ७०५ तसेच वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ६ हजार ३७९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)