पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक नियुक्ती रखडली; भाजपची सात नावे अद्याप प्रलंबित
पुणे, 20 मे (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, भाजपची सात नावे निश्चित न झाल्याने प्रक्रिया रखडली आहे. या नावांसाठी प्रदेश नेतृत्वाकडे स्वतः पाठपुरावा करत असल्याची माहिती महापौर
PCMC


पुणे, 20 मे (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, भाजपची सात नावे निश्चित न झाल्याने प्रक्रिया रखडली आहे. या नावांसाठी प्रदेश नेतृत्वाकडे स्वतः पाठपुरावा करत असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.महापालिकेत भाजपचे ८४ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ३७ नगरसेवक आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने मार्च महिन्यातच नियुक्ती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तीन सदस्यांचे अर्ज वेळेत दाखल केले असताना भाजपकडून अद्याप अर्ज सादर करण्यात आलेले नाहीत.राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार असतानाही भाजपकडून मार्च महिन्यापासून हा विषय तहकूब ठेवण्यात येत असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना महापौर लांडगे म्हणाले की, स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणे अत्यावश्यक आहे. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण येत असून, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जून महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे शक्य होणार नाही.“भाजपची सात नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. त्या संदर्भात प्रदेश नेतृत्वाकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या सभेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande