सिंहस्थ कुंभमेळा 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये आधुनिक वे-फाइंडिंग प्रणालीचे नियोजन सुरू
नाशिक, 20 मे (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सहज, सुलभ आणि विनाअडथळा मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीच्या साईनेज आणि वे-फाइ
Planning of direction boards


नाशिक, 20 मे (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सहज, सुलभ आणि विनाअडथळा मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीच्या साईनेज आणि वे-फाइंडिंग प्रणालीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे.यासंदर्भात सोमवारी नाशिक येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीस नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि कुंभमेळा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मार्क रॉस यांनीही बैठकीत सहभाग घेतला. त्यांनी सिडनी ऑलिम्पिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वे-फाइंडिंग आणि साईनेज प्रणालीच्या रचनेत योगदान दिले असून मोठ्या गर्दी व्यवस्थापनासाठी त्यांच्या कामाला जागतिक मान्यता मिळाली आहे.

बैठकीत 2015 मधील नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा तसेच प्रयागराज महाकुंभातील दिशादर्शक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. सिंहस्थ 2027 मध्ये गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि भाविकांचे मार्गदर्शन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक प्रणाली विकसित करण्यावर चर्चा झाली.

आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “भाविकांना कोणालाही विचारावे लागू नये अशी स्पष्ट, सोपी आणि सहज समजणारी बहुभाषिक दिशादर्शक व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे.”

बैठकीत स्थायी व अस्थायी फलक, पार्किंग व्यवस्था, घाट, मंदिरे आणि सार्वजनिक सुविधांशी सुसंगत दिशादर्शक प्रणाली तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वे-फाइंडिंग पद्धतींचा अभ्यास करण्यात आला.

येत्या आठवड्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात संबंधित विभागांची संयुक्त पाहणी दौरे होणार असून, महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी करून दिशादर्शक व्यवस्थेचा अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande