
पुणे, 20 मे (हिं.स.) पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या बदल्यांचा मोठा खांदेपालट करण्यात आला असून, महत्त्वाची व ‘मलईदार’ समजली जाणारी खाती मिळवण्यासाठी राजकीय लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी स्पष्ट संदेश दिला आहे. प्रशासकीय शिस्त राखण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.सर्वाधिक चर्चेत राहिलेला आकाशचिन्ह विभाग माधव जगताप यांच्याकडून काढून तो संदीप कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसेच प्रशासनावर देखरेख ठेवणाऱ्या दक्षता विभागाची जबाबदारी प्रभारी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या सामान्य प्रशासन विभागाची सूत्रे आता किशोरी शिंदे यांच्या हाती देण्यात आली असून, सांस्कृतिक व क्रीडा विभागाची जबाबदारी डॉ. संतोष टेंगले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.याशिवाय इतर काही विभागांमध्येही बदल करण्यात आले आहेत. मात्र अतिक्रमण निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन आणि मिळकतकर विभागांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.दरम्यान, महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी काही उपायुक्तांकडून राजकीय स्तरावर लॉबिंग सुरू असल्याची चर्चा होती. अशा अधिकाऱ्यांना तुलनेने कमी महत्त्वाची खाती देत आयुक्तांनी प्रशासनात शिस्तीचा संदेश दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु