
लॉज चालकांसह 8 जोडप्यांवर गुन्हे दाखल
नांदेड, 20 मे (हिं.स.) : लोहा शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरी विस्तार झाला असून गंगाखेड रोड, नांदेड रोड, कंधार रोड तसेच लातूर रोड परिसरात अनेक नवीन लॉज सुरू करण्यात आले आहेत.
व्यापार, बांधकाम तसेच विविध व्यावसायिक कारणांमुळे बाहेरील नागरिकांची शहरात वाढलेली वर्दळ लक्षात घेता लॉज व्यवसायातही मोठी वाढ झाली होती.मात्र, शहरातील काही लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, चंद्रकांत जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राम केदार यांच्या पथकाने शहरातील विविध लॉजवर अचानक धाडसत्र राबवले. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.
पोलिसांनी विविध लॉजची तपासणी केली असता काही ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात काही लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचेही निष्पन्न झाल्याचे समजते.
या प्रकरणी संबंधित लॉज चालक, व्यवस्थापक तसेच आठ जोडप्यांविरोधात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे लॉज व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे.
दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis