
-बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली-बांग्लादेशच्या विजयाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताची घसरण
ढाका, 20 मे (हिं.स.)बांगलादेशने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करत २-० ने निर्भेळ विजय मिळवला. सिल्हेट येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने पाकिस्तानला ७८ धावांनी पराभूत करून मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या गुणतालिकेत बांगलादेशला मोठी आघाडी मिळाली, तर भारताला मोठा धक्का बसला.
या मालिकेनंतर, २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल दिसून आला. बांगलादेशचा संघ सलग दोन विजयांसह पाचव्या स्थानावर पोहोचला, तर भारताची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताची गुण टक्केवारी ४८.१५ आहे, तर बांगलादेशची टक्केवारी ५८.३३ वर पोहोचली आहे. पाकिस्तानचा संघ ८.३३ गुण टक्केवारीसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया सध्या ८७.५० गुण टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंड दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २३२ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात ३९० धावा करून पाकिस्तानसमोर ४३७ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला केवळ ३५८ धावाच करता आल्या आणि ते ७८ धावांनी सामना हरले. या सामन्यात, पहिल्या डावातील १२६ आणि दुसऱ्या डावातील ६९ धावांच्या कामगिरीबद्दल लिटन दासला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, तर मालिकेत सर्वाधिक २५३ धावा करणाऱ्या मुशफिकुर रहीम मालिकावीर ठरला. पहिल्या कसोटीत बांगलादेशने पाकिस्तानला १०४ धावांनी पराभूत केले होते.
बांगलादेशला कसोटीच्या अखेरच्या दिवशी जिंकण्यासाठी केवळ तीन विकेट्सची आवश्यकता होती. ७५ धावांवर नाबाद असलेला मोहम्मद रिझवान हा पाहुण्या संघाचा शेवटचा आधारस्तंभ होता. पाचव्या दिवशीही पाकिस्तानला विजयासाठी १२१ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य गाठायचे होते. रिझवान आणि सलमान आगा यांच्यातील १३४ धावांच्या भागीदारीने बांगलादेशला विजयासाठी प्रतीक्षा करायला लावली, जरी असे वाटत होते की ते पाकिस्तानला पूर्णपणे बाद करण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, शेवटच्या अर्ध्या तासात तैजुल इस्लामने घेतलेल्या दोन महत्त्वपूर्ण विकेट्समुळे ही भागीदारी तुटली, ज्यामुळे यजमानांना विजयाचा पाया रचता आला आणि अंतिम दिवशी पाकिस्तानला सर्वबाद करता आले. अंतिम दिवशी साजिद खान, मोहम्मद रिझवान आणि खुर्रम शहजाद बाद झाले. रिझवानने १६६ चेंडूंमध्ये ९४ धावा केल्या.
तत्पूर्वी, सामनावीर लिटन दासच्या १२६ धावांच्या शानदार खेळीमुळे बांगलादेशने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २३२ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात मुशफिकुर रहीमच्या १३७, लिटन दासच्या ६९ आणि सलामीवीर महमुदुल हसन जॉयच्या ५२ धावांच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानसमोर ३९० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. शान मसूदचा संघ हे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. तैजुल इस्लामने नऊ बळी घेतले, ज्यात अंतिम डावातील सहा बळींचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे