
माद्रिद, 20 मे (हिं.स.)दोन वेळा विम्बल्डन चॅम्पियन राहिलेल्या कार्लोस अल्कारजने मनगटाच्या दुखापतीमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. गेल्या महिन्यात झालेल्या बार्सिलोना ओपन स्पर्धेदरम्यान अल्कारजच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली होती. या आठवड्याच्या शेवटी सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमधूनही त्याने आधीच माघार घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो क्ले-कोर्टवरील ही स्पर्धा जिंकत होता.
कार्लोस अल्कारजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले, माझी प्रकृती सुधारत आहे आणि मला खूप बरे वाटत आहे, पण दुर्दैवाने, मी अजूनही खेळण्यासाठी तयार नाही. अल्कारजने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून वर्षाची सुरुवात केली आणि टेनिसमधील चारही प्रमुख विजेतेपदे जिंकणारा तो सर्वात तरुण पुरुष टेनिसपटू ठरला होता. अल्काराझने २०२३ आणि २०२४ मध्ये सलग दोन ग्रास-कोर्ट ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली. दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये त्याने नोव्हाक जोकोविचचा पराभव केला होता. गेल्या वर्षी, अंतिम सामन्यात तो यानिक सिनरकडून पराभूत झाला होता.
विम्बल्डन आणि लंडनच्या क्वीन्स क्लबमधील सराव स्पर्धांमध्ये सहभागी होऊ न शकल्याबद्दल हा स्पॅनिश टेनिसपटू म्हणाला, या दोन्ही स्पर्धा माझ्यासाठी खूप खास आहेत आणि मला त्यांची खूप आठवण येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे