
ठाणे, २० मे (हिं.स.) ईगल ठाणे स्ट्रायकर्सने २०२६ च्या टी२० मुंबई लीगसाठी आपल्या संघाची घोषणा केली. भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे.या संघात अनुभवी क्रिेकेटपटू आणि युवा प्रतिभेचे उत्तम मिश्रण आहे. गेल्या हंगामात ईगल ठाणे स्ट्रायकर्स उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता, पण आठ गडी राखून पराभूत झाला. यावेळी, संघ विजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
संघाचे मालक विकी रूपचंदानी म्हणाले, या हंगामासाठी आम्ही जो संघ एकत्र केला आहे, त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत. संघात अनुभवी क्रिकेटपटूंसोबतच असे युवा क्रिकेटपटूही आहेत, जे मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक आहेत. गेल्या वेळी आम्ही उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलो होतो आणि यावेळी विजेतेपद जिंकणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला खात्री आहे की क्रिकेटपटू सर्वोत्तम कामगिरी करतील आणि आमच्या समर्थकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील.
टी२० मुंबई लीग १ जून ते १३ जून दरम्यान आयोजित केली जाणार आहे. ईगल ठाणे स्ट्रायकर्स आपला पहिला सामना १ जून रोजी वांद्रे ब्लास्टर्सविरुद्ध खेळेल. पुरुष गटात एकूण आठ संघ सहभागी होतील, त्यापैकी अव्वल चार संघ ११ जून रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा संघ :
आदित्य विनोद गिरी, अमर्त्य राजे, अनुज विनोद गिरी, अथर्व अंकोलेकर, अयान मोहित जैन, एकनाथ दिनेश केरकर, कार्तिक मिथिलेश मिश्रा, मनन भट, ओंकार तुकाराम तरमळे, रोहन राजेंद्र घाग, साईराज पाटील, शार्दुल ठाकूर, शशिकांत जगताप, योगेश कुमार, शार्दुल ठाकूर. मोतीराम रॉड्रिग्स, शिवांश लल्लन सिंग, सिद्धांत मनोज सिंग, सुमेर सम्राट जवेरी, विनय सुरेश कुंवर, आणि धनय पारेख.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे