रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठातील शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांना पीएचडी
रत्नागिरी, 20 मे, (हिं.स.) । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामध्ये कार्यरत कनिष्ठ सांशोधन सहाय्यक सौ. शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांनी राजस्थानमधील उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून कृषिविद्या विषयात पीएचडी पदवी मिळ
शिल्पा नाईक यांना पीएचडी प्रदान


रत्नागिरी, 20 मे, (हिं.स.) । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामध्ये कार्यरत कनिष्ठ सांशोधन सहाय्यक सौ. शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांनी राजस्थानमधील उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून कृषिविद्या विषयात पीएचडी पदवी मिळविली.

त्या विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. सी. चापलोट यांच्या मार्गदर्शनाखली त्यांनी महाराष्ट्रातील कोकण विभागासाठी भात, चवळी पीकपद्धतीतील सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर संशोधन केले. त्यासाठी त्यांना डॉ. बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठाचे तत्कालीन शिक्षण संचालक आणि सध्याचे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. एस. बोडके यांचे सहमार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले. कोकण कृषि विद्यापीठाच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांची पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्याबाहेर प्रवेश घेण्याच्या अटीवर निवड झाली होती. त्यानुसार त्यांनी उदयपूर येथील कृषि विद्यापीठात प्रवेश घेऊन हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.

डॉ. सौ. शिल्पा यांनी दापोलीच्या कृषि महाविद्यालयातून १९९४ साली बी. एस्सी. (कृषि) ही पदवी प्राप्त केल्यानंतर १९९६ पासून कृषि विद्या विभागात कृषि पर्यवेक्षक म्हणून नोकरीची सुरुवात केली. तिथपासून आजपर्यंत त्यांनी विद्यापीठात विविध पदांवर काम केले. विद्यापीठाच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांनी कृषिविद्या विषयात सन २०१८ मध्ये एमएस्सी (कृषि) पदवी प्राप्त केली. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर त्यांना बढती मिळाली. त्यांनी त्यांच्या सेवाकाळात शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण अशी तिन्ही प्रकारची कामे केली. त्यांनी बागकाम तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवले. निम्नस्तर कृषि अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून तसेच या अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन करण्याचे कामही केले.

उद्यानविद्या विभागात काम करीत असताना तेथे भेट देणारे शेतकरी, विद्यार्थी, पर्यटक यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पालवी एक अनोखा उत्सव या कार्यक्रमात विदेशी फळे भाजीपाला प्रदर्शन, पुष्परचना प्रदर्शन या कार्यक्रमाच्या आयोजनातही सहभाग घेतला. त्यांनी बचत गटांना तसेच इतर महिलांना फळप्रक्रिया आणि नाचणी प्रक्रिया विषयक वर्गामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यांतील काही महिलांनी व्यावसायिक तत्त्वावर नाचणी प्रक्रिया पदार्थाचा व्यवसायही सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande