
* कर्तव्यात कसूर व प्रगणकाला शिवीगाळ प्रकरण
अमरावती, 20 मे (हिं.स.)
आगामी जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा करणे आणि माहिती विचारणाऱ्या प्रगणकालाच थेट फोनवर शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्यधिकारी तथा चार्ज अधिकारी यांनी राधाबाई सारडा महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा जनगणना पर्यवेक्षक प्रा. समीर बिजवे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास जनगणना अधिनियम १९४८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने तालुक्यातील कर्मचारी वर्गात तीव्र खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जनगणनेसाठीप्रा. समीर बिजवे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नियुक्ती झाल्यापासून त्यांनी त्यांच्या अधिनिस्त प्रगणकांना कोणतीही माहिती दिली नाही, अथवा त्यांच्याशी कोणताही समन्वय साधला नाही. याबाबतची माहिती घेण्यासाठी आणि कामाचे नियोजन समजून घेण्यासाठी जनगणना प्रगणक रवींद्र भागवत यांनी प्रा. बिजवे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, कामाची माहिती देण्याऐवजी प्रा. बिजवे यांनी प्रगणक भागवत यांना फोनवरच शिवीगाळ केली. पर्यवेक्षकाकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे प्रगणक रवींद्र भागवत यांनी तात्काळ या घटनेची लेखी माहिती अंजनगाव सुर्जीचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि सहकाऱ्याला शिवीगाळ करणे हा गंभीर प्रकार असल्याचे लक्षात घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. मुख्याधिकाऱ्यांनी प्रा. समीर बिजवे यांना नोटीस बजावून २४ तासांच्या आत या वर्तनाचा लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीत खुलासा सादर न केल्यास, जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ व १२ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या कडक भूमिकेमुळे तालुक्यातील जनगणना पर्यवेक्षक आणि प्रगणकांच्या गोटात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी