सोलापूर जिल्हा बँकेत ८०० पदे रिक्त; मोठ्या भरतीची शक्यता
सोलापूर, 20 मे (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मंजूर असलेल्या १७०० पदांपैकी तब्बल ८०० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या पदभरती संदर्भातील नियमावली जाहीर केली असून, त्यानुसार भ
सोलापूर जिल्हा बँकेत ८०० पदे रिक्त; मोठ्या भरतीची शक्यता


सोलापूर, 20 मे (हिं.स.)।

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मंजूर असलेल्या १७०० पदांपैकी तब्बल ८०० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या पदभरती संदर्भातील नियमावली जाहीर केली असून, त्यानुसार भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव असणार आहेत.सध्या बँकेला पदभरतीस अधिकृत मान्यता मिळालेली नसली, तरी ‘आरबीआय’च्या निकषांची पूर्तता झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

ठेवींमध्ये वाढ करणे, सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्जवाटप, शासकीय कर्मचाऱ्यांची पगार खाती, वीजबिल संकलन, मायक्रो फायनान्सद्वारे कर्जवाटप तसेच शेती कर्ज आणि थकबाकी वसुली यांसारख्या विविध कामांसाठी बँकेला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे.सध्या बँकेत केवळ ९०० कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून बँकेचा व्यवसाय सुमारे दहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. रिक्त पदे भरल्यास बँकेचा व्यवसाय आणखी पाच ते सहा हजार कोटी रुपयांनी वाढू शकतो, असा विश्वास बँक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, बँकेने अद्याप पदभरतीसाठी औपचारिक मान्यता मागितलेली नसून, याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. सध्या सहकार आयुक्तांनी प्रशासकाला सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे सहकार विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. अंतिम निर्णय सहकारमंत्र्यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार असून, संचालक मंडळ निवडणुकीनंतरच पदभरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande