
सोलापूर, 20 मे (हिं.स.)।
सोलापूर शहराच्या गंभीर पाणीप्रश्नावर शाश्वत तोडगा काढण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापतीरंजीता चाकोतेआणि मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे हे जागतिक बँकेच्या विशेष अभ्यासदौऱ्यासाठी डेन्मार्क येथे रवाना झाले असून, त्यांनी तेथील प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा देखील केली आहे.डेन्मार्कमध्ये झालेल्या बैठकीत सोलापूरच्या पाणीटंचाईची तीव्रता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडताना सभापती रंजीता चाकोते यांनी शहराला सध्या केवळ सहा ते सात दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्टपणे सांगितले.सोलापूरकरांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने डेन्मार्कमधील अत्याधुनिक जलव्यवस्थापन तंत्रज्ञान, पाणी पुनर्वापर पद्धती आणि शाश्वत जलपुरवठा मॉडेलचा अभ्यास करण्यात येत आहे.आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि सभापती रंजीता चाकोते हे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर संयुक्तपणे प्रयत्न करत असून, सोलापूरसाठी दीर्घकालीन आणि शाश्वत जलव्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.या दौऱ्यामुळे सोलापूरच्या पाणीप्रश्नाला जागतिक स्तरावर मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसह संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड