
सोलापूर, 20 मे (हिं.स.)। सोलापूर शहरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नुकत्याच जुळे सोलापुरातील घरफोडीच्या घटनेनंतर विडी घरकूल परिसरातील एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यामुळे अनेक नागरिक घरांचे दरवाजे उघडे ठेवून बाहेर किंवा टेरेसवर झोपतात. तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे परगावी जात असल्याने बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर येत आहेत. याच संधीचा फायदा घेत चोरटे घरफोडी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.शहर पोलिसांनी नागरिकांना घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा आणि घर बंद ठेवताना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखांच्या पुढे गेली असून शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ आणि पोलिस ठाण्यांची संख्या अपुरी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ‘डायल ११२’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने ‘१९३०’ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. त्यामुळे फसवणूक करून लंपास केलेली रक्कम संबंधित बँक खात्यात गोठविणे शक्य होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.चोरी, घरफोडी आणि सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड