

रायगड, 20 मे, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाची घोषणा केली असून, जिल्ह्यात ही मोहीम २० जून २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमांतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन मतदारांना दोन प्रतींमध्ये प्रगणना फॉर्म वाटप करणार आहेत. संबंधित मतदार घरी उपलब्ध नसल्यास BLO ला किमान तीन वेळा भेट देणे बंधनकारक राहणार आहे.
मतदारांनी फक्त प्रगणना फॉर्म भरून द्यायचा असून, आवश्यक माहिती https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तपासता येणार आहे. तसेच हा फॉर्म ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती दाखल करता येतील. त्यानंतर हरकतींची छाननी करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता राहणार असून, जन्मकालावधीनुसार पालकांच्या कागदपत्रांचीही मागणी करण्यात येणार आहे. परदेशात जन्म झालेल्या अथवा नैसर्गिकीकरणाद्वारे नागरिकत्व मिळालेल्यांसाठी स्वतंत्र कागदपत्रांची अट ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण २ हजार ७९० मतदान केंद्रे असून मतदारांची संख्या २५ लाख ४५ हजार ७९२ इतकी आहे. त्यापैकी १५ लाख ९८ हजार १७६ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण ६२.७८ टक्के आहे.
या राष्ट्रीय कार्यक्रमात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)