परभणी - ई-फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांद्वारे कडकडीत बंद
परभणी, 20 मे (हिं.स.)। ऑनलाइन औषधविक्रीतील (ई-फार्मसी) वाढ, मोठ्या कंपन्यांचे किंमत धोरण तसेच जीएसआर 220 (ई) व जीएसआर 817 (ई) या अधिसूचना मागे घ्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने 20 मे रोजी पुकारलेल्या एक दिवसीय देशव्यापी बंद आं
ई-फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांद्वारे कडकडीत बंद ः शहरासह जिल्ह्यातील चित्र ः प्रशासनास निवेदन ः ऑनलाईन विक्री, किंमत धोरण व अधिसूचना माघारी घेण्याची मागणी


परभणी, 20 मे (हिं.स.)। ऑनलाइन औषधविक्रीतील (ई-फार्मसी) वाढ, मोठ्या कंपन्यांचे किंमत धोरण तसेच जीएसआर 220 (ई) व जीएसआर 817 (ई) या अधिसूचना मागे घ्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने 20 मे रोजी पुकारलेल्या एक दिवसीय देशव्यापी बंद आंदोलनास परभणी महानगरासह जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन आणि ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले होते. देशभरातील सुमारे 12 लाख 40 हजार औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणार्या या संघटनांच्या विविध मागण्या शासन दरबारी निर्णयाविना अद्याप प्रलंबित आहेत, हे निदर्शनास आणून दिले होते. विशेषतः ई- फार्मसीद्वारे औषध विक्री करतांना वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनची योग्य तपासणी न करता मोठ्या प्रमाणावर औषधे दिली जात आहेत. यामुळे स्व-औषधोपचाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून नागरिक नकळत स्वतःच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. तज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे अनेकदा दुष्परिणामकारक ठरु शकतात, त्यामुळे दीर्घकालीन आजार वाढण्याची शक्यता आहे, असे या संघटनेने म्हटले होते.

याशिवाय मोठ्या कंपन्यांकडून कमी दरात औषध विक्री होत असल्याने लहान औषध विक्रेते आर्थिक अडचणीत सापडत असल्याचेही या संघटनांनी नमूद केले. सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या अनुषंगानेच 20 मे रोजी संपूर्ण देशभरातील औषध विक्रेते एक दिवशीय आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे संघटनांनी नमूद केले.

दरम्यान, महानगरासह जिल्ह्यातील संतप्त औषध विक्रेत्यांनी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनास जोरदार प्रतिसाद दिला. संपूर्ण शहरात सर्वदूर औषधी दुकाने दिवसभर पूर्णतः बंद होती. या दरम्यान, जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, कोषाध्यक्ष पवन झांजरी यांच्यासह अन्य औषध विक्रेत्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांची भेट घेऊन तपशीलवार निवेदन सादर केले. या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande