लातूर - विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; प्रशासनाकडे धाव
लातूर, 20 मे (हिं.स.)। NEET 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी
निवेदन


लातूर, 20 मे (हिं.स.)। NEET 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात समस्त लातूरकरांच्या वतीने देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, NEET 2026 पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सध्या CBI मार्फत सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बाधित विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करून त्यांच्या शैक्षणिक व मानसिक नुकसानभरपाईसाठी विशेष योजना जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच NEET परीक्षा घेणारी NTA समिती तात्काळ बरखास्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

पेपरफुटीमुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने समुपदेशन केंद्र सुरू करावे, तसेच शासनामार्फत स्वतंत्र टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच प्राध्यापक शिवराज मोटेगावकर संचालित क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या क्लासेसवर कायमस्वरूपी बंदी घालून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande