
नांदेड, 20 मे (हिं.स.)। नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील खैरगाव शिवारामध्ये नायगाव ते नरसी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नायगाव पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल साई सांगवीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरगाव शिवारातील नायगाव-नरसी मार्गावर
असलेल्या श्री पांडुरंग ट्रेडर्स दुकानासमोरील बंद शटरच्या ओट्यावर अंदाजे ६० वर्षे वयाचा एक अनोळखी पुरुष मृत अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ नायगाव पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती हा वेडसर व भटक्या स्वरूपाचा वाटसरू असल्याचे समोर आले असून, तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, सदर मयत व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास अथवा संबंधित इसमाची ओळख पटत असल्यास नागरिकांनी तात्काळ नायगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis