
बीड, 20 मे (हिं.स.)।
वाल्मिक कराड तीन दिवसांपासून सलाईनवर असून उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती आहे. रुग्णालयातील पथकाने वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली
मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडला सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे. गेले तीन दिवस वाल्मिक कराड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला सलाईन लावण्यात आल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, वाल्मिक कराड याला युरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. सिस्टायसिस मूत्राशयाचा आजार आहे. यामध्ये मूत्रमार्गात बॅक्टेरियामुळे संसर्ग होतो. वाल्मिक कराड याला अशाच आजाराची लागण झाल्याचा अंदाज आहे.
बीड जिल्हा रुग्णालयातील पथकाने वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याला सलाईन लावण्यात आली असून त्याची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरु आहेत. वाल्मिक कराड याला वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis