
नाशिक, 20 मे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नाशिक येथील नवीन जिल्हा परिषद, एबीबी सर्कल, त्र्यंबक रोड परिसरात महिलांनी रिकामे हंडे घेऊन तीव्र निदर्शने केली.हे आंदोलन नॅशनल फेडरेशन ऑफ इंडिया वूमन (NFIW) आणि आयटक कामगार संघटना, नाशिक जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
आंदोलक महिलांनी सांगितले की, मुळेगावातील महिलांना गेल्या चार पिढ्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरील विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. दररोज दोन ते चार तास केवळ पाणी आणण्यासाठी खर्च करावा लागत असल्याने महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कणा व मणक्याचे आजार वाढत असल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढल्याचेही आंदोलकांनी नमूद केले. याशिवाय विहिरीत बुडून चार बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे सांगण्यात आले.
वालदेवी धरणातून दहेगाव मार्गे जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही गावाला अद्याप पाणी मिळाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
कुंभमेळा रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे पाइपलाइन फुटल्याचे सांगितले जात असून ती तात्काळ दुरुस्त करून गावाला नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
प्रशासनाने तातडीने नळपाणी योजना, विहिरींचे संरक्षण, पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि जलजीवन मिशन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनांनी दिला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV