
* पुनर्वसन इमारत क्र. १ मधील 'एफ', 'जी' व 'एच' विंग ला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त
मुंबई, 20 मे (हिं.स.) - आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या पुनर्वसन इमारत क्र. १ मधील 'एफ', 'जी' व 'एच' विंग मध्ये एकूण ८२७ पात्र रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास गुरुवार, दि. २१ मे, २०२६ पासून वरळीतील सुमेर केंद्र इमारतीच्या म्हाडा साईट कार्यालयात प्रारंभ करण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील विंग 'एफ', 'जी' व विंग 'एच' या विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून सदर विंगमधील एकूण ८२७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मंडळातर्फे करण्यात येणार असून, यावेळी सर्व पात्र रहिवाशांना वितरण पत्र प्रदान करण्यात येणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०६.०० वाजता सार्वजनिक सुट्टी सोडून सदर वितरण पत्रांचे वाटप केले जाणार आहे. वितरण पत्र/ ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकीत प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (रु. ५००/- च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट साईजचे ३ नविन रंगीत फोटो, पुनर्वसित सदनिकेमध्ये सोबत वास्तव्य करणा-या कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो (पोस्टकार्ड साईज) या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
त्याचबरोबर मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, निवासी सदनिकांचे वितरण विंग 'एफ', 'जी' व 'एच' या क्रमाने करण्यात येणार असून वितरण पत्र स्वीकारण्याबाबतचे वेळापत्रक वरील नमूद ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानुसार, सदनिकाधारकांनी वरील ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सदनिकेचे वितरण पत्र स्विकारावे व त्यानंतर सदनिकेचा ताबा घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्रमांक ०१ मधील डी व ई विंग मधील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे वितरण दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे, दिवंगत तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होणार्या पुनर्वसन इमारतीतील सदनिकांचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जात आहे.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १२१ जुन्या चाळींतील ९ हजार ६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एकूण भूखंडापैकी ६५ टक्के जागेचा पुनर्वसनासाठी वापर करण्यात आला आहे. १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहे. स्टील्ट + पार्ट सहा मजली पोडियम पार्किंगमध्ये प्रत्येक सदनिकाधारकास एकास एक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरण पूरक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, ग्रेनाइट ओटा, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकचा ओट्टा, ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, तीन लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट, १ फायर लिफ्ट देण्यात आली आहे.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र व्यापारी संकुल शाळा, व्यायामशाळा, रुग्णालय, वसतिगृह आदी सुविधांचे नियोजन असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. वरळी प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींची 'म्हाडा'तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार असून मुंबईच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार जांबोरी मैदान व आंबेडकर मैदानाचे जतन केले जाणार आहे. चाळीतील जुन्या इमारतीचे 'जैसे थे' जतन करुन म्हाडातर्फे संग्रहालय बनविण्यात येणार आहे. या माध्यमातून बीडीडी चाळींची माहिती व वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असून भावी पिढीला याद्वारे बीडीडी चाळींच्या इतिहासाबाबत माहिती उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे.
‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला विशेष वेग मिळाला आहे. वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला. निवासी व अनिवासी गाळेधारकास २५ हजार रुपये प्रति महिना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात येत आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे ८६ एकरवर वसलेल्या सुमारे २०७ चाळींचा समावेश आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे २० पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी