कॅनमधून पेट्रोल-डिझेल देण्यास बंदीमुळे शेतकरी अडचणीत
रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । जिल्ह्यात पावसाळा व शेतीचा मुख्य हंगाम लवकरच सुरू होत आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून कॅन, डब्यातून पेट्रोल-डिझेल देण्यास घातलेल्या बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने
उबाठा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । जिल्ह्यात पावसाळा व शेतीचा मुख्य हंगाम लवकरच सुरू होत आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून कॅन, डब्यातून पेट्रोल-डिझेल देण्यास घातलेल्या बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना शेतीकामासाठी इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. उबाठाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर केले.

अलीकडे शेती यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे. शेतजमीन तयार करणे, नांगरणी, चिखलणी यासाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर वीडर, ब्रश कटर व पाण्याचे पंप यांसारख्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ही सर्व यंत्रे पेट्रोल-डिझेलवर चालतात. मात्र, सध्या सुरक्षा नियम व इंधन कपातीचे कारण देत जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरून नागरिकांना कॅन, डबे, बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शेतात चालणारी अवजड यंत्रे थेट पेट्रोल पंपावर आणणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

शेतीचा हंगाम काही दिवसांवर आलेला असताना इंधनाअभावी कामे वेळेत सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या बंदीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी तातडीने उचित कार्यवाही करावी व शेतीच्या कामासाठी पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दत्ता कदम यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande