
पुणे, 21 मे (हिं.स.)। राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ” स्थापन केले आहे. या मंडळामार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी वाहनांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन पुणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
योजनेसाठी अर्जदारांकडे वैध अनुज्ञप्ती (लायसन्स), बॅज, वाहन परवाना, शिधापत्रिका, आधारकार्ड आणि पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे. पात्र चालक व मालकांनी अधिकृत संकेतस्थळ ananddighekalyankarimandal.org वर जाऊन ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ज्या सभासदांनी १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि १ मे २०२६ पर्यंत मंडळात नोंदणी केलेली आहे, अशा पात्र सभासदांना “सन्मान निधी योजना” अंतर्गत १० हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु