मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासनाने सतर्क राहावे : विभागीय आयुक्त नयना गुंडे
अमरावती, 21 मे (हिं.स.) : पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत सज्ज ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिले. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या ग
आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश


अमरावती, 21 मे (हिं.स.) : पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत सज्ज ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिले. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांसह आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागांमध्ये तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला अपर आयुक्त संजय जाधव, कृषी सहसंचालक गणेश घोरपडे उपस्थित होते. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

विभागीय आयुक्तांनी सांगितले की, पूरबाधित किंवा संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये नागरिकांसाठी उंच ठिकाणी निवारा केंद्रे तयार ठेवावीत. तसेच अन्नधान्य, औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आधीच उपलब्ध करून ठेवावा. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी जलस्त्रोतांची नियमित तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सर्पदंश आणि विंचूदंशावरील औषधे व इंजेक्शन्स प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवावीत, तसेच दुर्गम भागातील गर्भवती महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा सुनिश्चित कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफची बचाव पथके तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अवकाळी पाऊस किंवा वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने सुरळीत करण्यासाठी महावितरण यांनी नियोजन करण्यास सांगितले.

धरणांमधून पाणी सोडण्यापूर्वी संबंधित तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि नियंत्रण कक्षाला २४ तास आधी माहिती देणे बंधनकारक राहील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नदीकाठच्या धोकादायक गावांमध्ये ब्लू लाईन आणि रेड लाईनचे सीमांकन करून पूर प्रतिबंधक समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले.

दुर्गम भागांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यावरही भर देण्यात आला. हवामान विभागाचे इशारे नागरिकांपर्यंत त्वरीत पोहोचविण्यासोबतच वीज पडण्याचा इशारा देणाऱ्या दामिनी ॲप बाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीच्या शेवटी विभागीय आयुक्तांनी संभाव्य पूरस्थिती, पावसाची आकडेवारी, औषध साठा आणि खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागांना आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande