
अमरावती, 21 मे (हिं.स.)
शेतकऱ्यांचा शेतमाल संपल्यानंतर बाजारात तेजी येण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. सध्या सुरू असलेल्या अधिक मासात बाजारात शेतमालाचे दर अधिक वाढल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यंदाही शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. कपाशीने यावर्षी व या महिन्यात ९ हजार ९०० रुपयांचा भाव गाठला आहे. चण्याचे भाव सहा हजारांवर गेले तर सोयाबीनचे भाव आता सात हजार पाचशे रुपयापर्यंत पोहोचले आहे. अधिक मासात शेतमालाचे अधिक भाव वाढतील अशी कुठलीही आशा शेतकऱ्यांना नव्हती. शेतकऱ्यांना प्रारंभी कापूस सहा हजार रुपये भावापासून बाजारात विकावा लागला. त्यात कधी हमीभावही त्यांना मिळाला नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी पड्या दरात शेतमाल खरेदी केला. कापूस असो वा सोयाबीन अशी अवस्था सर्वच शेतकऱ्यांवर आली. शेतकऱ्यांचा शेतमाल संपल्यानंतर आता बाजारात शेतमालाचे दर वाढल्याने त्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना नसल्याचे दिसून आले. सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांजवळ कोणताही शेतमाल उपलब्ध नसल्याने फक्त कांदा पीक उपलब्ध आहे. त्याला दर नसल्याने ते ठेवले तर वढत्या उष्णतेमुळे ते सडण्याच्या मार्गावर आले आहे. सध्या कांद्याला वाजारात पट्टीवर व्यापारी पाच ते आठ रुपये किलो दराने खरेदी करीत आहे. गेलेल्यावाढता खर्च अन् भावाची तफावत शेतीत दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांना दर मिळत नसल्याने सध्या शेती करणे अवघड झाले. अशात जेव्हा दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांचा शेतमाल संपलेला असतो. अशा सर्व स्थितीत शेती करावी की करू नये असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी सध्या विवंचनेत सापडला आहे. सुरू असलेल्या चक्रामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असल्याचे पुढे आले आहे. बी- बियाणे, खते, मजुरी, मजुराचा ने- आण खर्च व इतर खर्च वाढल्यामुळे शेतकरी आता शेती करावी की करू नये ? की ठेका द्यावी... अशा एक ना अनेक प्रश्नांच्या चक्रात अडकला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी