गडचिरोलीत भीषण बस अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
गडचिरोली, 21 मे (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात सकाळी एक भीषण बस अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेली प्रवासी बस मुरखळा (नवेगाव) परिसरातील धोकादायक वळणावर अचानक पलटी झाल्याने ह
गडचिरोली एसटी बस अपघाताचे छायाचित्र


गडचिरोली, 21 मे (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात सकाळी एक भीषण बस अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेली प्रवासी बस मुरखळा (नवेगाव) परिसरातील धोकादायक वळणावर अचानक पलटी झाल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्यामाहितीनुसार, गडचिरोली आगाराची एसटी महामंडळाची बस (क्र. एम.एच. 14 0741) आज, गुरुवारी सकाळी 7.15 नादका उमरखेडला रवाना झाली. यावेळी बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटली. अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत एका वर्षाच्या चिमुकल्यासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. प्रशासन किंवा रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे अनेक जखमींना वेळीच मदत मिळाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार डॉ. नरोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन जखमी प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिले.

सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून या भीषण अपघातामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande