
अमरावती, 21 मे (हिं.स.)
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी मार्डी रोडवरील महाबीज कार्यालयात बियाण्यांचे पॅकेटिंग युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. विविध पिकांच्या बियाण्यांची साठवण, प्रक्रिया आणि पॅकेट तयार करण्याचे काम सध्या कामगारांकडून वेगाने सुरू आहे.महाबीजकडून यंदा सर्वाधिक मागणी सोयाबीन बियाण्यांची असून सुमारे १५०० क्विंटल सोयाबीन बियाणे तयार करण्यात येत आहेत. त्यासोबतच तुरीच्या ५५० क्विंटल बियाण्यांचे पॅकेटिंग सुरू असून उडीद व संकरित मका या पिकांचे प्रत्येकी १०० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बीटी कापसाचे सुमारे ३ हजार पॅकेट्सही तयार करण्यात आले आहेत.याशिवाय सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी २०० लिटर जैविक उत्पादने तसेच ७ हजार लिटर जैविक खतांचा साठाही तयार ठेवण्यात आला आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे आणि कृषी साहित्य उपलब्ध करून देण्याचा महाबीजचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, महाबीज संस्थेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने संपूर्ण वर्षभर “सुवर्ण महोत्सव वर्ष” साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कृषी जनजागृती उपक्रम, शेतकरी मेळावे आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी