
नागपूर, 21 मे (हिं.स.) : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत Belatardi Police Station च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सहकार्याने दाखवलेल्या अत्यंत तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे एका महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. या वेगवान कारवाईमुळे कुटुंबात घडू शकणारा संभाव्य खूनाचा प्रकार टळला आहे.
ही घटना 21 मे रोजी मध्यरात्री सुमारे 12.05 वाजता घडली. बेलतरोडी पोलिसांचे नाईट पॅट्रोलिंग सुरू असताना गोटाळपांजरी परिसरात एका व्यक्तीच्या वडिलांनी पोलीस वाहन थांबवून आपला मुलगा त्याच्या पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण घोडके आणि अंमलदार रितेश गोतमारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अंमलदार रितेश गोतमारे यांनी धाडस दाखवत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आत आरोपी ऋषिकेश सुरेंद्र वानखडे हा त्याची पत्नी आश्लेषा वानखडे हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत असल्याचे आढळले.
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून त्याला ताब्यात घेतले.
यानंतर जखमी महिलेला तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी विशेष पोलीस पथकाने तिला एम्स रूग्णालयात हलवले. पोलीस आणि वैद्यकीय पथकाच्या समन्वयामुळे केवळ 15 मिनिटांत सुमारे 9.3 किलोमीटरचे अंतर पार करत महिलेला वेळेत उपचार मिळाले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 109 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडी परिसरात प्रभावी नाईट पेट्रोलिंगमुळे 2025 व 2026 दरम्यान खुनाच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान केला आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी