अमरावती विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या घटली
अमरावती, 21 मे (हिं.स.) : विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, यंदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी बुधवारी राजकीय पक्षांच्य
अमरावती विधानपरिषद निवडणुकीसाठी यंदा एस डी ओ स्तरावर फक्त सात मतदान केंद्रे


अमरावती, 21 मे (हिं.स.) : विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, यंदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी बुधवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, यापूर्वी तालुकानिहाय १४ मतदान केंद्रे होती. मात्र, यंदा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) स्तरावर सात मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मतदारसंख्येनुसार अमरावती, अचलपूर-चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी-दर्यापूर, वरूड-मोर्शी-शेंदुरजनाघाट, चिखलदरा-धारणी, तिवसा-भातकुली तसेच चांदूर रेल्वे-धामणगाव-नांदगाव खंडेश्वर या विभागांमध्ये मतदान केंद्र राहणार आहेत.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी येरेकर यांनी उमेदवार, प्रचारक आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्वांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश दिले. प्रचार साहित्याच्या तपासणीसाठी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, राजकीय पक्षांना मतदारांची मसुदा यादी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यावर हरकती नोंदविण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार याद्या मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध करण्यात येतील.

या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande