
* निसर्गाच्या संकेतांनी वाढली पावसाची उत्सुकता
अमरावती, 21 मे (हिं.स.)
सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाचे आगमन होत असते. यंदा भारतीय हवामान विभाग तसेच हवामान अभ्यासक संस्थांनी पावसाबाबत विविध अंदाज वर्तवले असतानाच निसर्ग मात्र पावसाच्या आगमनाचे सकारात्मक संकेत देताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या कडक झळांमध्येही परिसरात बहाव्याच्या झाडांनी घेतलेला बहर नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, तो आगामी पावसाची चाहूल मानला जात आहे.
तालुक्यातील सावरखेड परिसरात बहाव्याची झाडे सध्या पिवळ्या व नारंगी फुलांनी नटली आहेत. रस्त्याच्या कडेला आणि शिवारात फुललेल्या बहाव्यामुळे वातावरणात एक वेगळेच सौंदर्य निर्माण झाले आहे. उन्हाच्या दाहकतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या निसर्गरम्य दृश्यातून पावसाच्या आगमनाची सुखद आशा मिळत आहे. पूर्वी हवामान अंदाजासाठी आधुनिक यंत्रणा किंवा वेधशाळा नसतानाही शेतकरी आणि ग्रामीण भागातील जाणकार मंडळीनिसर्गातील बदलांवरून पावसाचा अंदाज बांधत असत. पक्ष्यांचे वर्तन, वृक्षांचे बदल, कोकिळेचे मंजुळ गायन, कावळ्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात करणे तसेच पळस आणि बहावा फुलणे ही पावसाच्या आगमनाची पारंपरिक लक्षणे मानली जात होती. यंदा पक्ष्यांनी घरटी बांधण्यास लवकर सुरुवात केली असून बहावादेखील अपेक्षेपेक्षा लवकर बहरल्याने पाऊसही वेळेआधी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणकारांच्या मते, बहावा फुलल्यानंतर साधारण ३० ते ४० दिवसांच्या आत पावसाला सुरुवात होते, असा पूर्वापार अनुभव आहे. केवळ सावली किंवा सौंदर्य देणारे वृक्ष म्हणून नव्हे, तर निसर्गातील बदलांचे संकेत देणारे 'नेचर इंडिकेटर' म्हणूनही बहाव्याकडे पाहिले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी