अमरावतीत शिवटेकडी जॉगिंग ट्रॅकवर मनपाकडून फॉगर्सची सुविधा
अमरावती, 21 मे (हिं.स.) : अमरावती शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान तब्बल 46.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर बुधवारीही हवामान विभागाने उष्णत
शिवटेकडीवर जॉगिंग ट्रॅकवर पाण्याचे फॉगर्स; उष्णतेच्या तडाख्यात नागरिकांना दिलासा


अमरावती, 21 मे (हिं.स.) : अमरावती शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान तब्बल 46.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर बुधवारीही हवामान विभागाने उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे.

वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असून सार्वजनिक ठिकाणीही वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने शिवटेकडी येथील जॉगिंग ट्रॅकवर पाण्याचे फॉगर्स बसविले आहेत. शिवटेकडी परिसरात दररोज सकाळी आणि सायंकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच जॉगिंगसाठी येत असतात. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे येथे फिरणेही अवघड बनले होते.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे जॉगिंग ट्रॅक परिसरात थंडावा निर्माण होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. व्यायाम किंवा जॉगिंगनंतर घामाने ओलेचिंब झालेल्या नागरिकांना फॉगर्समधून येणाऱ्या थंड पाण्याच्या फवाऱ्यांमुळे उकाड्यातही गारव्याचा अनुभव मिळत आहे.

नागरिकांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande