मान्सूनपूर्व तयारीसाठी अमरावती झेडपी प्रशासन सज्ज साथरोग प्रतिबंध, स्वच्छता मोहीम जोर
अमरावती, 21 मे (हिं.स.) जिल्हा परिषद अमरावतीद्वारे आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भाप्रसे) यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियोजन, समन्वय आणि तातडीच्या प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्याबाब
मान्सूनपूर्व तयारीसाठी झेडपी प्रशासन सज्ज साथरोग प्रतिबंध, स्वच्छता मोहीमे जोर


अमरावती, 21 मे (हिं.स.)

जिल्हा परिषद अमरावतीद्वारे आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भाप्रसे) यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियोजन, समन्वय आणि तातडीच्या प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्याबाबत संबंधित विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

यावेळी बोलताना सत्यम गांधी म्हणाले की, आगामी पावसाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना तत्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी मनुष्यबळ, साधनसामग्री आणि समन्वय व्यवस्था सज्ज ठेवण्यावर त्यांनी भर दिला. पूर्वनियोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व यंत्रणा कार्यान्वित ठेवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.दूषित पाण्यामुळे साथीचे रोग फैलावू नयेत यासाठी जलस्रोतांची गुणवत्ता तपासणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, विहिरी व जलस्त्रोत परिसराची स्वच्छता राखणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा, प्रतिबंधात्मक औषधे व वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. विशेषतः आदिवासी व दुर्गम गावांतील गरोदर मातांच्या सुरक्षिततेसाठी जवळच्या आरोग्य केंद्रांमध्ये पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या. साथरोग निवारणासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथकांचे गठन करण्यात आले असून, तालुका स्तरावरील पथकांनी मान्सूनपूर्व कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावामध्ये पाण्याचे स्रोत, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, विहिरींचा परिसर, गावातील घाणवस्वच्छता याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच १ जून ते १० जून या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवून सर्व जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.तसेच जीर्ण व धोकादायक स्थितीतील जिल्हा परिषद शाळा, इमारती व सार्वजनिक वास्तूंचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) बाळासाहेब रायबोले, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) स्नेहा धावडे तसेच सर्व गट विकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande