
बीड , २२ मे (हिं.स.) : गेवराई तालुक्यातील मारफळा जवळील राठोड तांडा येथून एका शेतकऱ्याचा अडीच लाख रुपये किमतीचा दुर्मिळ ‘चंद्रकोर’ बोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. कपाळावर चंद्रकोरीसारखे दुर्मिळ चिन्ह असलेल्या या बोकडाला चोरट्यांनी पात्रूड येथील आठवडी बाजारात नेऊन अवघ्या ४० हजार रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित शेतकरी मनोज साहेबराव राठोड यांच्या मालकीचा हा वैशिष्ट्यपूर्ण बोकड अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून लंपास केला. बोकड चोरीला गेल्याचे लक्षात येताच मनोज राठोड यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. चौकशीदरम्यान पात्रूडच्या आठवडी बाजारात दोन संशयित तरुणांनी हा बोकड विकल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर कापड बांधलेल्या दोघांनी सुरुवातीला बोकडासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, अखेरीस त्यांनी अवघ्या ४० हजार रुपयांत सौदा करून व्यापाऱ्यांना बोकड विकल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मनोज राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजलगाव रोड, मोंढा नाका, संभाजी चौक बायपास तसेच पात्रूड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.
प्राथमिक तपासात चोरटे वाहन घेऊन आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis