जळगावच्या लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडला कोट्यवधींचा मुद्देमाल
जळगाव , 22 मे (हिं.स.) अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. उपनिबंधकाच्या लॉकरवर टाकलेल्या छाप्यात
जळगावच्या लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडला कोट्यवधींचा मुद्देमाल


जळगाव , 22 मे (हिं.स.) अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. उपनिबंधकाच्या लॉकरवर टाकलेल्या छाप्यात तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अवैध सावकारीच्या कारवाईत तक्रारदारासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी शहरातील सहकारी संस्थांच्या उपनिबंधक जगदीश बाबुराब बारी आणि खासगी एजंट देविदास पाटील या दोघांना पाच लाखांची लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती तीन लाख आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (२० मे) रंगेहाथ पकडले होते.यानंतर सुरू झालेल्या तपासात जगदीश बारी यांच्या भुसावळ येथील बँक लॉकरची माहिती समोर आली. अधिकाऱ्यांनी लॉकरची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड आढळून आली.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि इतर दागिने, १० किलो ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये इतकी असल्याची माहिती ACB ने दिली. दरम्यान, आरोपी जगदीश बारी यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि इतर गुंतवणुकींचीही सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande