
रायगड, 22 मे (हिं.स.)। खोपोली येथील गजबजलेल्या गुरुवार बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पर्समधून तब्बल २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे बाजारपेठेत खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे खोपोली येथील गुरुवार बाजारपेठेत हनुमान मंदिरालगत असलेल्या भांड्यांच्या स्टॉलजवळ महिला फिर्यादी व त्यांची मामी खरेदी करत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने फिर्यादी यांच्या पर्सची चैन अलगद उघडून त्यामधील सोन्याचे दागिने लबाडीने चोरून नेले.
घटना लक्षात येताच महिलांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत संबंधित महिला गर्दीतून पसार झाली होती. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १८६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) नुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दबडे करीत आहेत.
दरम्यान, बाजारपेठेतील वाढती गर्दी आणि महिलांच्या पर्सवर लक्ष ठेवणाऱ्या टोळ्यांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)