
रायगड, 22 मे (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरात एका आलिशान बंगल्यात घुसून तब्बल २९ लाख ५५ हजार रुपयांच्या मालमत्तेची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कशेळे येथील ‘जया व्हिला’ या बंगल्यात आरोपीने बेकायदेशीर प्रवेश करून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान केले. संबंधित बंगला हा मुंबईतील भांडूप पश्चिम परिसरात राहणाऱ्या फिर्यादी यांच्या मालकीचा आहे. आरोपी हा अंधेरी परिसरातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेदरम्यान आरोपीने बंगल्यातील विविध वस्तूंची तोडफोड करत मोठे आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३२(सी), ३२४(५), ३५२ आणि ३(५) नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भालेराव करीत असून आरोपीच्या हालचालींबाबत अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. पोलिसांकडून आरोपीला लवकरच ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)