
लातूर, 25 मे (हिं.स.)।
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या शैक्षणिक ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि 'लातूर पॅटर्न बचाव कृती समिती'ने सोमवारी जोरदार आंदोलन छेडले. जिल्हा उद्योग केंद्राने ट्यूशन क्लासेस, वसतिगृहे, खानावळी आणि अभ्यासिकांबाबत काढलेल्या नोटिसीचा निषेध करत आंदोलकांनी उद्योग भवन परिसरात नोटिसीची जाहीर होळी केली.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी २२ मे रोजी जारी केलेल्या नोटिसीत लातूर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात उत्पादनाव्यतिरिक्त सुरू असलेल्या शैक्षणिक व संबंधित व्यवसायांवर कारवाईचे संकेत दिले होते. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कारवाई विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी प्रशासनावर दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला. “इतर शहरांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या चुकीकडे वैयक्तिक स्वरूपात पाहिले जाते; मात्र लातूरमध्ये एखादी घटना घडली की संपूर्ण ‘लातूर पॅटर्न’लाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो,” असे ते म्हणाले.
आंदोलनादरम्यान वक्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. “चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्या निमित्ताने इंडस्ट्रियल इस्टेटमधील सर्व ६३ प्लॉटधारकांना एकाच मापदंडाने नोटीस बजावणे अन्यायकारक आहे. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची आणि सुनावणीची संधी दिली पाहिजे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनात काँग्रेसचे प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, उपमहापौर स्नेहल उटगे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. लातूरच्या शैक्षणिक अस्मितेला धक्का देणारे निर्णय मागे घेतले नाहीत, तर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis