सहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर शितलचेे पोलीस भरतीत यश
परभणी, 25 मे (हिं.स.)। परिस्थिती कितीही हलाखीची असली आणि वाटेत अडचणींचे डोंगर उभे असले, तरी मनात जिद्द आणि सोबतीला खंबीर पाठिंबा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे खेर्डा येथील सुपुत्री आणि मोरेगावची सून शितल अरुणा भास्कर भुजबळ हिने सिद्ध करून द
सहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर शितलचेे पोलीस भरतीत यश : जिद्द, संघर्ष आणि पतीच्या साथीने गाठले यशाचे शिखर


परभणी, 25 मे (हिं.स.)।

परिस्थिती कितीही हलाखीची असली आणि वाटेत अडचणींचे डोंगर उभे असले, तरी मनात जिद्द आणि सोबतीला खंबीर पाठिंबा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे खेर्डा येथील सुपुत्री आणि मोरेगावची सून शितल अरुणा भास्कर भुजबळ हिने सिद्ध करून दाखवले आहे. विवाहानंतर तब्बल सहा वर्षांचा संघर्ष आणि अथक परिश्रम करत तिने पोलीस भरतीत घवघवीत यश संपादन केले असून तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शितलची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरात दोन मोठ्या बहिणी असल्यामुळे शिक्षणासाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, शिक्षणाची जिद्द कायम ठेवत तिने खेर्डा गावापासून दूर असलेल्या पांडुरंग विद्यालय, मोरेगाव येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नूतन महाविद्यालय, सेलू येथून आर्ट्स शाखेतून पुढील शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच तिचा विवाह उद्धव भगवानराव मोरे यांच्याशी झाला. लग्नानंतर मुलींची स्वप्ने आणि शिक्षण थांबते, असा समाजातील समज खोटा ठरवत तिचे पती उद्धव मोरे यांनी तिला स्पर्धा परीक्षांसाठी पूर्ण पाठबळ दिले. स्वतः शिक्षक असलेल्या उद्धव मोरे यांनी पत्नीच्या डोळ्यांतील स्वप्न ओळखून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिच्या मेहनतीला साथ दिली.लग्नानंतर तब्बल सहा वर्षे शितलने हार न मानता सातत्याने अभ्यास आणि सराव सुरू ठेवला. तिने साहेब अकॅडमीमध्ये दोन वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्वतंत्र रूम करून राहत अहोरात्र अभ्यासासोबत मैदानी चाचणीची तयारी केली. या संपूर्ण संघर्षमय प्रवासात तिचे पती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. अनेक अडचणींवर मात करत शितलने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय ती पती आणि कुटुंबीयांना देत आहे. शितलच्या या यशाबद्दल खेर्डा व मोरेगाव परिसरातील नागरिकांसह विविध स्तरांतून तिच्यावर आणि तिच्या पतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande