
पुणे, 25 मे (हिं.स.)।संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिर परिसरात अतिक्रमण, बेशिस्त दुचाकी पार्किंग आणि निरुपयोगी बॅरिकेट्समुळे भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोहोचणेही आता भाविकांसाठी जिकिरीचे बनले आहे.
मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत परिसरात दुचाकींची मोठी गर्दी पाहायला मिळते. मंदिर परिसरात वाहने येऊ नयेत यासाठी देवस्थानकडून पोलिसांच्या सूचनेनुसार सुमारे 32 लाख रुपये खर्च करून दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. मात्र, याच पायऱ्यांवर आता दुचाकीस्वार सर्रास वाहने उभी करत असल्याचे चित्र दिसत आहे.याशिवाय पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स अनेक वर्षांपासून त्याच अवस्थेत पडून आहेत. या बॅरिकेट्सच्या आडोशाला वाहनांची पार्किंग होत असल्याने भाविकांना चालण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करून वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करावे, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु