सर्व पक्षांनी बीएलए नेमून प्रशासनाला सहकार्य करावे-मुख्य निवडणूक आयुक्त
छत्रपती संभाजीनगर, 25 मे (हिं.स.)मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे मॅपिंग सु
Q


छत्रपती संभाजीनगर, 25 मे (हिं.स.)मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे मॅपिंग सुरू आहे.मात्र, २००२ मधील मतदार यादी आणि सध्याच्या यादीतील नावे जुळविताना विविध अडचणी निर्माण होत असल्याने कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय एजंटांची (बीएलए) नियुक्ती करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.चोक्कलिंगम म्हणाले की,शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या जिल्हाध्यक्षांमार्फत अधिकृत बीएलए यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे अपेक्षित आहे.धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने १५२३ बीएलए नियुक्त केले आहेत.मात्र,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना, शिवसेना (उबाठा),वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि इतर पक्षांकडून अद्याप बीएलएची नियुक्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे स्थानिक स्तरावर मतदार मॅपिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदार यादी पुनर्नरीक्षण प्रक्रियेदरम्यान बीएलओंनी प्रत्येक घरी भेट देऊन संबंधित सदस्यांची माहिती,आवश्यक पुरावे घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यास प्राधान्य द्यावे,असे निर्देश श्री.चोकलिंगम यांनी दिले.तसेच नाव,वय किंवा अन्य तपशील बदलायचा असल्यास जन्म दाखला,फोटो,स्वाक्षरी यांसारखे आवश्यक पुरावे संकलित करून ते ऑनलाइन अपलोड करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

धाराशिव शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना नोटिसा पाठविण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी,असे निर्देश देताना श्री.चोकलिंगम यांनी ग्रामीण भागात जनजागृतीसाठी विशेष मेळावे आयोजित करण्यासही सांगितले.मतदार यादीसंदर्भातील सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने व्यापक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.एखाद्या नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळल्यास त्यामागील कारण स्पष्ट करावे लागणार असून, संबंधित नोटीस व दूरध्वनी संपर्काची नोंद व्यवस्थित ठेवावी लागणार असल्याचे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.

मॅपिंगचे काम टाळणाऱ्या किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओंना नोटिसा देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.मतदार मॅपिंगची सद्यस्थिती नागरिकांना समजण्यासाठी हेल्प डेस्क सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.पुरावे नसलेल्या गरीब नागरिकांची नावे यादीतून वगळली जाऊ नयेत,याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.कोणाच्याही मनात आपले नाव मतदार यादीतून वगळले जाईल,अशी भीती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने मदत करावी,असे श्री.चोकलिंगम म्हणाले.

बीएलओंनी प्रत्येक घराचा क्रमांक आणि मोबाईल क्रमांक अचूक नोंदवावा.त्यामुळे कुटुंब मॅपिंग अधिक प्रभावीपणे करता येईल,असे सांगत मॅपिंग न झालेल्या मतदारांकडून अर्ज क्रमांक ६ भरून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.मात्र, त्यासोबत आवश्यक सर्व पुरावे जोडणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande