कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १९ गोवंशीय जनावरांची सुटका; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड, 25 मे (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव शिवारात वेगवेगळ्या चार आखाड्यांवर पोलिसांनी धडक छापे टाकून कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेली तब्बल १९ गोवंशी जनावरे जप्त केली आहेत. या कारवाईत गायी, बैल आणि गुरे यांसह एकूण ४ लाख रुपय
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १९ गोवंशीय जनावरांची सुटका; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


बीड, 25 मे (हिं.स.)।

अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव शिवारात वेगवेगळ्या चार आखाड्यांवर पोलिसांनी धडक छापे टाकून कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेली तब्बल १९ गोवंशी जनावरे जप्त केली आहेत. या कारवाईत गायी, बैल आणि गुरे यांसह एकूण ४ लाख रुपये किमतीच्या पशुधनाची सुटका करण्यात आली असून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे बर्दापूर येथील सायगाव बीटचे अंमलदार शरद कदम यांनी या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. बर्दापूर पोलिसांना सायगाव शिवारातील वेगवेगळ्या आखाड्यांवर गोवंशी जनावरे कत्तलीसाठी आणून पत्राच्या शेडमध्ये उपाशीपोटी बांधून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बर्दापूरचे प्रभारी अधिकारी सपोनि जगताप, पोउपनि घुले आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन सायगाव शिवारातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले.

या छाप्यादरम्यान पोलिसांनी आखाड्यांचे मालक यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या जनावरांची पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय तपासणी करून पालनपोषणासाठी अंबाजोगाई येथील आशा दत्त गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande