बीडमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना घोटाळ्यातील ८१ लाख रुपये केले हस्तगत
बीड, 25 मे (हिं.स.)। येथील सायबर पोलीस ठाण्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेअंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास करत मोठी यशस्विता मिळवली आहे. या घोटाळ्यातील तब्बल ८१ लाख ७८ हजार २८९ रु
बीडमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना घोटाळ्यातील ८१ लाख रुपये केले हस्तगत


बीड, 25 मे (हिं.स.)।

येथील सायबर पोलीस ठाण्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेअंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास करत मोठी यशस्विता मिळवली आहे. या घोटाळ्यातील तब्बल ८१ लाख ७८ हजार २८९ रुपयांची रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या बँक पोर्टल लॉगिनचा गैरवापर करून तसेच कर्जासाठीची खोटी कागदपत्रे तयार करून तब्बल २ कोटी ५१ लाख ५१ हजार ६९२ रुपयांच्या अनुदानाचा अपहार करण्यात आला होता. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग सहसंचालक बाळासाहेब त्रिंबक यशवंते यांच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा तपास सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आला होता.

हा गुन्हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने बीड सायबर पोलिसांनी आधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करून आरोपींचा माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींकडून आणि बँक खाती गोठवून पोलिसांनी आतापर्यंत ८१ लाख ७८ हजार २८९ रुपये हस्तगत केले आहेत. ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक, पोलीस उपनिरीक्षक स्वाती लहाने आणि त्यांच्या पथकाने केली. या यशस्वी कामगिरीनंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना काळजी घेण्याचे, अनोळखी लिंक्स किंवा एपीके (APK) फाईल्सवर क्लिक न करण्याचे आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande