
बीड, 25 मे (हिं.स.)केज तालुक्यातील माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी, सुकळी परिसरालाअचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली असून केळी, आंबा, कांदा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. काही रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
वादळाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून माळेगाव येथील सुमारे ७ एकर तर सुर्डी-सोनेसांगवी परिसरातील जवळपास २० एकर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेली केळीची पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवारातील अनेक ठिकाणी आंब्याची सपरंड झाली असून मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडले आहेत. कांदा आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची दखल घेत तलाठी बालाजी इंगळे आणि कृषी सहाय्यक कमलाकर राऊत यांनी बाधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.
दरम्यान, वादळामुळे वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे वीजतारा आणि वीजपोल कोसळल्याने अनेक गावांचा कृषी फिडर चा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis