
छत्रपती संभाजीनगर, 25 मे (हिं.स.)खरीप हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषि विभाग यांच्या वतीने विभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषि निविष्ठांचे वितरण, तपासणी आणि सनियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हानिहाय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ए.एल. काळुशे, तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पी.ए. ताजणे, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद, एच.एस. कातोरे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक आणि एस.जी. बंडगर, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यासाठी ए.एल. काळुशे यांची पथक प्रमुख, एन.डी. भदाणे आणि एम.के. काटे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यासाठी ए.एल. काळुशे यांच्या नेतृत्वाखाली एस.जी. गरांडे आणि व्ही.पी. भोसले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पथकांसाठी एस.जी. बंडगर हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
संपूर्ण विभागात चांगल्या प्रतीच्या कृषि निविष्ठांचे व्यवस्थित वितरण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी नियोजन करावे, तसेच शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय कृषि सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी दिल्या आहेत.
कृषि निविष्ठांच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री आढळल्यास संबंधित उत्पादक अथवा विक्रेत्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून गंभीर प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही कृषि विभागाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis