
नाशिक, 25 मे (हिं.स.)।
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान' आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' अंतर्गत जिल्ह्यात 'जनभागीदारी अभियाना'ची अतिशय उत्साहात सुरुवात झाली आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (कळवण) कार्यालयाच्या वतीने नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रनखेडा अंतर्गत रामवाडी येथे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जनभागीदारी अभियानाअंतर्गत आयोजित 'लाभार्थी संतृप्ती' शिबिराला परिसरातील कातकरी, ठाकर आणि भिल्ल समाजातील सुमारे १५० ते २०० नागरिकांनी उपस्थित राहून विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि थेट लाभ घेतला. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी महसूल, आदिवासी विकास, आरोग्य आणि महिला बाल विकास यांसारखे महत्त्वाचे विभाग या शिबिराच्या माध्यमातून थेट जनतेच्या दारात पोहोचले होते. या शिबिरामध्ये आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, महसूल विभागाचे दाखले, आरोग्य तपासणी आणि महिला बचत गटांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आदिसेवा केंद्रांतर्गत आयोजित जनसुनावणीमध्ये नागरिकांच्या स्थानिक अडीअडचणी थेट समजून घेत त्यावर जागेवरच तात्काळ मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर, नांदगावचे नायब तहसीलदार श्री. कुऱ्हे व श्री. महाजन, स्थानिक सरपंच, उपसरपंच, महिला बाल विकास प्रकल्पाच्या अधिकारी श्रीमती निरभवणे, तालुका आरोग्य अधिकारी, तसेच MSRLM चे गट व्यवस्थापक . भदाणे यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
राज्यातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सर्व शासकीय विभागांच्या योजनांचे अभिसरण करून जनभागीदारी अभियान राबवले जात आहेत. 'पीएम-जनमन' आणि 'धरती आबा अभियान' अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व गावांमध्ये लाभार्थी संतृप्ती शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या बांधवांनी या शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या हक्काच्या योजनांचा लाभ घ्यावा.
-डॉ. कश्मिरा संखे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (कळवण)
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV