
बीड, 25 मे (हिं.स.)।
केज येथील शिक्षक कॉलनी परिसरात नगर पंचायतीच्या २३ गुंठे खुल्या जागेवर राज्य शासनाने मंजूर केलेल्या १ कोटी रुपये खर्चाच्या नमो उद्यानाचे भूमिपूजन नगराध्यक्षा सीता बनसोड, गटनेते हारुन इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्यानामुळे केजचा चेहरामोहरा बदलणार असून, बालकांसह, वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे.
येथील केज नगर पंचायतीचे गटनेते हारुन इनामदार यांनी सांगितले, नमो उद्यानाचे नाव स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नमो उद्यान असेल. येथील सांस्कृतिक सभागृहालाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे नाव दिले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे.
यावेळी माजी सैनिक अजित धिवार, प्रकाश मुंडे, नगरसेवक बाळासाहेब गाढवे, नगरसेविका पद्मीनबाई शिंदे आदी उपस्थित होते.
या उद्यानाचे काम गोमाता वृक्षवल्ली ग्रुपच्या उमराई येथील केंद्रे नर्सरीच्या कान्होपात्रा व विष्णू केंद्रे या दाम्पत्याला मिळाले आहे.
उद्यानाच्या कामात कसलीही तडजोड केली जाणार नसून, तीन महिन्यांत उद्यानाचे काम पूर्ण करून लोकार्पण होणार असल्याचे नगराध्यक्षा सीता बन्सोड यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis