
बीड, 25 मे (हिं.स.)।
माजलगाव तालुक्यातील लऊळ
परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला असून यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. काही मिनिटांतच जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. गारपीट आणि मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गारपिटीमुळे शेतातील उभी पिके वाऱ्यामुळे आडवी पडली असून
भाजीपाला, फळबागासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणीपूर्व मशागत केली असताना झालेल्या गारपिटीमुळे चिंता वाढली आहे. वादळी वाऱ्यामुळे काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis