
नांदेड, 25 मे (हिं.स.)। जिल्हा काँग्रेस पक्षात केंद्रीय निवड समितीने खांदेपालट केला असून विद्यमान तिन्ही जिल्हा अध्यक्ष यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्यावर काँग्रेस पक्षाने अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाची ही खांदेपालट म्हणजे त्यांची सोय करुन दिली असून खासदार अशोकराव चव्हाण यांची बी टिम म्हणून शिक्का असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने धुरा सोपवली आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने संघटन सृजन अभियान या गोंडस नावाखाली पक्ष निरीक्षक पाठवून काम करणाऱ्या कार्यकत्यांना न्याय देण्याच्या भुमिकेतून संघटन सूजन अभियान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविले. सदर अभियानाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून तेलंगणा राज्यातील वेणूगोपाल हरकारा यांची नियुक्ती केली होती. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी घोषित केले आहेत पण त्यात या संघटन सूजन अभियानाचा फुगा फुटला आहे.
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर यांना अपेक्षेप्रमाणे नारळ दिला असून त्यांचेच भाचे खासदार प्रा रविंद्र चव्हाण यांना नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. तसेच नांदेड उतरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांना हटवून त्यांच्या जागेवर त्यांच्याच भावकीतील युवा नेतृत्व विठ्ठल पावडे यांना काम
करण्याची संधी दिली आहे. काँगेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांची वर्षाच्या आतील नियुक्ती असल्याने यांना काम करण्याची संधी दिली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागेवर शहराध्यक्ष म्हणून त्यांचेच पुत्र नगरसेवक तथा माजी उपमहापौर गफार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात फक्त खांदेपालट करण्यात आली आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis